Kolhapur Rain Update: नंदूरबार, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांनंतर कोल्हापूरचा समावेश राज्यातील सर्वाधिक पर्जन्यतूट असलेल्या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 51.9 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1,733.1 मिलिमीटर असताना यंदा केवळ 899 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे तब्बल 834.1 मिलिमीटरची तूट नोंदवली गेली आहे. 2015 नंतर (म्हणजेच 11 वर्षांनंतर) कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची ही सर्वात मोठी तूट आहे. यापूर्वी 2015 मध्ये सरासरीच्या केवळ 36.6 टक्के पाऊस झाला होता. राज्यातील सर्वाधिक पर्जन्यतूट असलेल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये नंदूरबार (49.6 टक्के), सोलापूर (50.8 टक्के), लातूर (51.4 टक्के), कोल्हापूर (51.9 टक्के), अमरावती (56.2 टक्के) आणि परभणी (56.8 टक्के) यांचा समावेश आहे. दुसरीकडे, पावसाचे वितरण लहरी राहिल्याने आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तीव्र तुटीमुळे 6 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड पडल्याने भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग व भाजीपाल्याची पिके करपली असून त्यांच्या वाढीवर आणि उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. एरवी सर्वाधिक पाऊस पडणारे गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा आणि चंदगड हे 6 तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. ट्रिगर वन लागू केलेल्या तालुक्यांमधील पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.

Continues below advertisement

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे दानेवाडी , जाफळे, केखले, माले , शहापूर अशा विविध ठिकाणी भेट देऊन भात, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, भुईमूग  आदी पिकांची पाहणी केली. या भेटींमध्ये जिल्हाधिकारी डॉ . राठोड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम आहे. नुकसान भरपाई देण्याकरिता पंचनामे जलद गतीने करणे सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी यांना चारा उपलब्ध बाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती तापोळे यांच्यासह विविध कर्मचारी शेतकरी उपस्थित होते. 

इतर महत्वाच्या बातम्या