नागपूरः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, या ठिकाणी पाण्यात पोहणे काहींच्या जीवावर बेतत आहे. रविवारी नागपुरात अंबाझरी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. नदी-तलावात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नदी, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


रविवारी नागपुरच्या अंबाझरी तलावात पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपुरातील चौघे जण फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर चौघांपैकी दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी बचाव पथक आणि पोलिसांनी तलावात बोट टाकत त्यांचा शोध घेतला. मात्र, काही वेळाने त्यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिहिर शरद उके (वय 19, रा. इंदोरा) आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (20, रा. लष्करीबाग) अशी तलावात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.


प्रशासन बघ्याच्या भूमिकेत


विकेंडला आणि सुट्ट्यांच्या दिवशी शहरातील अंबाझरी, फुटाळा परिसरात मोठ्या संख्येत नागपूरकर फिरायला येतात. मात्र याठिकाणी सुरक्षेची उपाय योजना प्रशासनातर्फे करण्यात आली नाही आहे. यापूर्वीही अंबाझरी आणि फुटाळा येथे आत्महत्या घडल्या आहे. दरवर्षी अशा घटना  घडत असताना प्रशासन बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. 


अवैध वसूलीही जोरात


मोठ्या संख्येत नागरिक याठिकाणी येत असल्याचे बघून परिसरातील काही भामट्यांकडून याठिकाणी अवैध पद्धतीने पे अॅन्ड पार्कच्या नावावर नागरिकांकडून पैसेही घेतात. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात येते. मात्र या ठिकाणहून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनाही हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


गर्दीने घेतली बघ्यांची भूमिका


मिहिर आणि चंद्रशेखर हे दोघेही बुडायला लागल्यामुळे काठावर असलेल्या दोघा मित्रांनी नागरिकांकडे ओरडून मदतीसाठी याचना केली. मात्र कोणीही मदतीसाठी धावून आला नाही तर दुसरीकडे अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास प्राधान्य दिले. रविवार असल्यामुळे तलावाच्या काठावर जवळपास असलेल्या 30 ते 40 जणांपैकी एकानेही मदतीसाठी धाव घेतली नाही. सगळ्यांनी बघ्यांची भूमिका घेतल्याने दोन तरुणांचा बळी गेला.