Jharkhand Cm Hemant Soren Writes Letter To President Murmu : मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. याचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. अशातच दोन महिलांना नग्न अवस्थेत नेलं जात असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर देशभरात खळबळ माजली आहे. या व्हिडीओचे संसदेतही पडसाद दिसले, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपींना सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपतींना पावले उचलण्याचे आवाहन केले.


मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काय लिहिले आहे पत्रात?


सोरेन म्हणाले की, "मणिपूर हे आदिवासी लोकांचे राज्य आहे. केंद्र सरकारकडून या प्रकरणावर मौन बाळगण्यात येत असून, या मुद्द्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तसेच माध्यमे आणि लोकांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न या निमित्ताने होत आहे. या झालेल्या कृत्यासमोर मौन बाळगणे हा देखील अत्यंत भयंकर गुन्हा आहे. मणिपूरमध्ये झालेल्या या भयानक हिंसाचाराबद्दल फार जड अंत:करणाने मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. आजवर या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत, मोठ्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, महिलांना वाईट वागणूक दिली आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.






व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांनाच अस्वस्थ केले. मणिपूरमध्ये न्याय, शांतता प्रास्थापित करण्याकरता काहीतरी मार्ग काढावा असे आवाहन सोरेन यांनी राष्ट्रपतींना या पत्राद्वारे केले आहे. मणिपूरच्या राज्य सरकारला स्वतःच्या लोकांनाही वाचविता येत नाही, त्यांचे रक्षण करता येत नाही, हे तर धक्कादायक आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ झाला, पण मणिपूर धगधगत आहे, तिथली शांतता भंग पावली आहे.


मणिपूरमधून जवळपास 40 हजार लोकांना त्यांच्या लहान मुलांसह इतरत्र स्थलातर केल्याची माहिती आहे. तात्पुरत्या निवारा केंद्रात त्यांनी आश्रय घेतला आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री सोरेन यांनी मणिपूरबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Manipur Violence: मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ