Jaykumar Gore सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Minister Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा मागणी केली होती. यामध्ये 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता. तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जावं लागलं, असं सदर महिलेने एका पत्रात म्हटलं होतं.
जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती-
2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होतं ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी मागितली होती, असा आरोप आता केला जात आहे. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
लेखी माफी मागूनही सुरू झाला पुन्हा त्रास
दहा दिवसांची जेलवारीही करावी लागलेल्या गोरेंनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता अशी माहिती आहे. मात्र, आता पुन्हा त्रास दिला जातोय अशीही तक्रार पीडित महिलेनं केली आहे. तसेच 2016 मधील दाखल केलेली तक्रार व्हॉट्सअॅप ग्रुपवर 2025 पासून व्हायरल करण्यात येत आहे. यामुळे आपले नाव आता उघड झाल्याचेही या महिलेचं म्हणणं आहे. तर आपल्यावर दबाव आणण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार गोरे यांनी पीए अभिजित काळेमार्फत केल्याचा दावाही या महिलेने केला होता.