SSC Exam Paper Leak : जालन्यातील बदनापूरच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याचा (SSC Exam Paper Leak) प्रकार शुक्रवारी (दि. 21) उघडकीस आला. एकीकडे शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर फुटल्याने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात शिक्षण अधिकारी मंगला धूपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात सीएससी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचार्याचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दहावी (SSC exam) बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर (Exam) फुटला. मराठीचा पेपर सुरू सकाळी 11 वाजता झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रावर उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळत असल्याचे समोर आले आहे. मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात होत्या. तर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील देखील दिसून आली.
बदनापूर परीक्षा पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक
यानंतर शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षण मंडळाच्या आदेशानंतर जालना जिल्हा प्रशासनाने प्रकरणाचा तपास करत कारवाई केली आहे. बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हस्तलिखित करून व्हायरल केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बदनापूर येथील ज्या सीएससी केंद्रावरून झेरॉक्स केल्या जात होत्या. त्या सीएससी केंद्र चालकासह, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व्हायरल करणाऱ्या एका इंग्रजी शाळेच्या कर्मचाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय म्हणाले शिक्षणमंत्री?
दरम्यान, पेपरफुटीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काही ठिकाणी कॉपी झाली. कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आले, तशा चित्रफितही प्रसार माध्यमातून पुढे आल्या. त्याची निश्चितपणे गंभीर दखल शासन स्तरावर घेतली आहे. यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली ते केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याच बरोबर यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे. त्या केंद्रावरील प्रशासन देखील बदलण्यात आले आहे. कॉपी पुरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ते केंद्र दहावीच्या परिक्षेसाठी रद्द केले जाईल, असे दादा भुसे यांनी म्हटले.
आणखी वाचा