जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज जालना (Jalna) येथे मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
वैभवी देशमुख म्हणाली की, आज आमचा आनंद आमच्यापासून फिरवून घेतला आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकलो. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा.
माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले?
तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. आम्ही ज्या वेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. आज आम्हाला फक्त चालताना धक्काबुक्की होत आहे. आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरीदेखील तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. पण माझा एक आरोपींना प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले? त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील, गावचे उत्तर मला हवे असल्याचे वैभवीने म्हटले.
वैभवीला अश्रू अनावर
मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की, मी देशमुख कुटुंबियातील मुलगी आहे. माझ्या आई वडिलांची मी लेक आहे. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, असे म्हणत वैभवीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
आणखी वाचा