जालना : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची गाडी जाळणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विश्वंभर तिरुखे असं त्याचं नाव असून तो मनोज जरांगे यांचा जवळचा सहकारी असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीच्या मागे मनोज जरांगे असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली. दरम्यान, विश्वंभर तिरुखे याने त्याच्यावरील आरोप कबुल केले आहेत.
दोन दिवसापूर्वी नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ डिझेल टाकून जाळल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला. तपासाअंती पोलिसांनी विश्वंभर तिरुखे याला अटक केली.
सोमवारपासून फरार असलेल्या विश्वंभर तिरुखे याला अंबड चौफुली येथे जालना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी तिरुखे याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.
जरांगेंवरही गुन्हा दाखल करा
यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ वाघमारे म्हणाले की, "गाडी जळणारा आरोपी मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा आणि निकटवर्तीय आहे. त्यामुळे जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागचा कर्ता-करविता मनोज जरांगे हेच आहेत. नारायण गडावर महंतांनी जरांगे आणि तिरुखे यांना एकत्रित माळ टाकली होती. त्यामुळे जरांगेंनी आता पळवाट काढू नये."
नेमकं काय घडलं?
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी सोमवारी (21 सप्टेंबर) एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला. गाडीवर टाकलेल्या कव्हरवर त्याने कॅनमधून आणलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली.
दरम्यान, या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण प्रकरणी नवनाथ वाघमारे यांनी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली.
ही घटना घडताच वाघमारेंनी मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले होते. आपली गाडी ही जरांगेंच्या सहकाऱ्यानेच पेटवल्याचा दावा त्यांनी केला होता.
ही बातमी वाचा: