Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच महागात पडला आहे. डेकोरेटरचा विना तिकीट प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर टीसीचे निलंबन देखील करण्यात येणार आहे. या घटनेकडे एक गंभीर त्रुटी म्हणून रेल्वे प्रशासनाकडून पाहिले जात आहे. या प्रकरणाची दक्षिण मध्य रेल्वेकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

6 जुलै रोजी 'नंदीग्राम एक्सप्रेस' (गाडी क्र. 1102) मधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने त्यांच्या 'फर्स्ट एसी' (1st AC) कपार्टमेंट सजावट करण्यासाठी ऑनलाइन एका डेकोरेटरची खाजगीरीत्या नेमणूक केली होती. जालना स्थानकावर त्या डेकोरेटरचा डब्यात झालेला प्रवेश अनधिकृत होता. या घटनेकडे एक गंभीर त्रुटी म्हणून रेल्वे प्रशासनाकडून पाहिले जात आहे. संबंधित टीसी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित योग्य ती कारवाई केली जाईल, असं दक्षिण मध्य रेल्वे करून सांगण्यात आलं आहे. याशिवाय, संबंधित डेकोरेटरविरुद्ध रेल्वे कायद्यातील विद्यमान तरतुदींनुसार रेल्वे गाडीत अनधिकृत प्रवेश, विनातिकीट प्रवास तसेच अनधिकृतपणे रेल्वे परिसरात प्रवेश (ट्रेसपासिंग) केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जालना ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने ही सजावट केल्याचे समोर

रेल्वेच्या फर्स्ट एसी केबिन मध्ये फुलांनी आणि सजावटीच्या साहित्याने 'हनीमून सूट'प्रमाणे सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या रेल्वेतील आगळ्यावेगळ्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. 6 जुलै रोजी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये जालना ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने ही सजावट केल्याचे समोर आले असून या प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेने  प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक अर्थात टीटीई ला निलंबित केलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित जोडप्याने एका इव्हेंट डेकोरेशन कंपनीच्या मदतीने फर्स्ट एसी केबिनची सजावट केली होती. त्या कंपनीच्या डेकोरेटर विरोधात जालना रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेत अनधिकृत प्रवेश ,विना तिकीट प्रवास, या सह इतर कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

रेल्वेच्या कोचमध्ये अशा प्रकारे अनाधिकृत व्यक्तीला प्रवेश मिळणे, ही एक गंभीर सुरक्षा चूक मानली जात आहे. या प्रकाराची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशीच्या निष्कर्षांनुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.