जालना : परळीच्या लाभार्थी टोळीला बोलता येत नसल्याने त्यांनी आता इतरांना हाताला धरुन मराठ्यांविरोधात उभे केलंय. ज्यांच्या आरक्षणाला काहीच धक्का लागणार नाही अशा गरीब धनगर आणि वंजारी समाजाला मराठ्यांच्या विरोधात भडकवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. मनोज जरांगे यांनी यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. त्याचा एक डोळा चष्म्यातून बाहेर येत आहे, गरीबांचे वाटोळं करण्याची बेक्कार फेड असते असा टोलाही जरांगे यांनी लगावला.
यांचा एक डोळा चष्म्याबाहेर येत आहे
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, "ज्याच्या नोंदी आहेत त्यांना दिले पाहिजे. यांच्या सारखे आम्ही जातीयवादी नाहीत. आम्हाला परळीची लाभार्थी टोळी विरोध करत आहे. त्याचा तर एक डोळा चष्म्याच्या बाहेर येऊ लागलाय, हे त्याचेच कार्यकर्ते, जातीतील माणसं सांगत आहेत. गरिबाचं वाटोळ करण्याची बेक्कार फेड असते. परळीच्या लाभार्थी टोळीचं ऐकून धनगर समाजाच्या वंजारी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या विरोधात धनगर, वंजारी घातलेत. अजित पवारांच्या या टोळीचं ऐकून धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहे."
आमचे आरक्षण इतके वर्षे खात होते
नागपूरमधील ओबीसी आंदोलनावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मला दुःख वाटतं, आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत. यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, यांचे किती वाईट विचार आहेत हे समोर येतं. ओबीसींना आरक्षण मिळताना आमचे लोक समाधानी असायचे. आम्ही लढून मिळवले, यांना लढावं लागलं नाह., दिले पण आमच्याच लोकांनी, यांचा जीआर पण आमच्या मराठ्यांच्या नेत्यांनी दिला. आमचेच इतकी वर्षे नुकसान झालं, आमचं आरक्षण तुम्ही इतके वर्षे खात होतात."
छगन भुजबळांवर टीका
छगन भुजबळांवर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, "चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा, छगन भुजबळ लय बोलतो ना. त्याला म्हणाव मागच्या पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या. ओपन मधल्या सगळ्या जागा सोडा. आम्ही तुमच्याबद्दल कधी वाईट बोललो नाही. तुमची एवढी वाईट नियत? तुम्ही किती विरोध करा, महाराष्ट्रातील मराठ्यांना मी आरक्षण देणारच."
मराठ्यांच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली. या टोळीच्या माध्यमातून धनगर हाताशी धरायचे. गरीब धनगरांना आणि बीडच्या धनगर, मराठ्यांना माहित आहे की लाभार्थी टोळी फक्त यांचा वापर करते असं म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली.
परळीच्या लाभार्थ्याने ओबीसी, वंजारी बदनाम केले
सरकार म्हणून कुणाला नाराज करणार नाही, कुणावरही अन्याय करणार नाही असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचं असून दिलं नाही तो अन्याय वेगळाच. वरती कार्यकर्ते असे पाळले तो अन्याय वेगळाच. परळीत पाळला एक. एक इकडचा येवल्याच्या अलिबाबा पाळला, कसा दिसतो चित्तर , अलीबाबा सारखा दिसतो पांढरी फकाट दाढी. कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला? त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व वंजारी, ओबीसी बदनाम केले. त्या गँगला आता बोलता येईना म्हणून दुसरे नेते बोलावून घेतले आणि इकडे जातीवाद पेटवून दिला."
लक्ष्मण हाके मराठा आणि धनगरांमध्ये वाद लावतोय
लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की, "आता कळालं का तुम्हाला दोन वर्षे त्याच्यावर मी बोलत नव्हतो. वैचारिक लढाई करणारे कोण आणि जातीजातीत वाद न होऊ देणारे कोण. पडळकर, जानकर, तायवाडे, शेंडगे हे विचाराची लढाई खेळायचे. परंतु हे अस्मितेवर घालायचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ त्याला परळीच्या लाभार्थी टोळीचं स्वप्न पूर्ण करायचे आहे, गोत्यात आणायचे धनगर आणि गोरगरीब ओबीसी. तुमच्या आई-बहिणीला आम्ही कधी बोललो का? तुला कोणी अधिकार दिला लेकी बाळीला बोलायचं? धनगरांना कळालं नसेल ही पैदास आपल्यात कशी आली. या लाभार्थी टोळीने धनगरांना हातपाय मोडेपर्यंत मारलेला आहे. इथून पुढे जशाला तसे होणार. तुम्ही आया बहिणीपर्यंत जाणार असाल तर याद राखा. अशा नासक्याच्या नादी लागून तुम्हाला धनगर मराठ्यांमध्ये वाद लावायचा का?"