जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले होते. तेव्हापासून मनोज जरांगे यांनी एकदाही घरची पायरी ओलांडून घरात प्रवेश केला नाही. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत घरी जाणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटले होते. आता सरकराने आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्याने जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. त्यामुळे 31 जानेवारीला मनोज जरांगे पाच महिने 2 दिवसानंतर आपल्या घरी जाणार आहेत. आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "मराठा आंदोलन झाल्यावर आम्ही रायगडाला जाऊ अशी घोषणा केली होती. त्यानुसार, आम्ही उद्या आंतरवाली येथून रायगडाकडे निघणार आहोत. तसेच, परवा म्हणजेच 30 जानेवारीला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार आहोत. त्यानंतर मी 31 जानेवारीला आपल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.


संजय राऊतांना उत्तर...


सरकारने जुन्याच नोंदी दाखवल्या असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या आरोपावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "संजय राऊत यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. विदर्भात 80 ते 82 टक्के आरक्षण असल्याचा माझा अंदाज आहे. वरच्या मराठ्यांना काहीच नाही. पश्चिम महाराष्ट्रात 45 ते 55 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे तिकडे सहज नोंदी सापडतात. त्यामुळे हा आकडा वाढत जातो. तिकडे सुद्धा शंभर टक्के आरक्षण नाही. परंतु, मराठवाड्यात नोंदी शोधण्यासाठी कसरत करावी लागते. यामुळे त्या विभागातील नोंदी जास्त प्रमाणात आढळल्या असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.


57 लाख नोंदी नवीन की जुन्या सांगता येणार नाही...


याच नोंदीबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की ,"मला सुद्धा गैरसमज होता, त्यामुळे मी त्यांना दोनदा विचारून घेतलं. सापडलेल्या नोंदी नवीन आहेत की जुन्या आहेत हे जाहीर करा. मात्र, त्यांनी काही जाहीर केलं नाही. परंतु, त्यांनी आता 57 लाख नोंदी सापडले असल्याचे लिहून दिले आहे. त्यामुळे या नोंदी आता नवीन असल्याचं ग्राह्य धरलं आहे. परंतु, सरकारने या नोंदी नवीन आहे की जुन्या याबाबत लेखी दिलं नसल्याचं जरांगे म्हणाले. मी सुद्धा खात्रीशीर सांगू शकत नाही की, 57 लाख नोंदी नवीन आहेत की जुन्या आहेत. पण, एकूण 39 लाख नवीन नोंदी वाटप केल्याचं सांगण्यात आल्याचे जरांगे म्हणाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : अध्यादेशाची उद्यापासूनच अमलबजावणी करा; मनोज जरांगेंची सरकारकडे विनंती