जालना : भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. खुनशीने आंदोलन आम्ही कधीच करत नाही. तुम्हीही करू नका. मराठ्यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या. बळजबरीने आमच्यात भांडण लावू नका. आम्ही जरी ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मात्र, धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आरक्षणाला आम्हीही विरोध करू शकतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. 


मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. यानंतर बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 


आरक्षण दिलं नाही तर सगळा हिशोब करीन


वडीगोद्री राड्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, रस्ता अडवल्यानंतर राडा होणारच आहे. आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमचा मूठभर समाज असताना आम्ही ऐकून घेतो. रस्ता अडवणाऱ्या पोलिसाला बडतर्फ करून टाका. रस्ता अडवून तुम्ही मराठा समाजाचा अवमान करणार का? लोकशाहीने अधिकार दिला आंदोलन करा, मग तुम्ही काय रस्ता अडवणार का?  आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे. मी 7 दिवसांपासून राजकीय भाषा बंद केली. आता फडणवीस यांनी 3-4 दिवसांतच अंमलबजावणी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. रात्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी 1,2 दिवसात काही निर्णय घेण्याचे आश्वासन दिलं म्हणून एक सलाईन लावली आहे. राजकारणाशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. अन्यथा 2024 ला मराठ्यांचे पोर ऐकणार नाही, आरक्षण दिलं नाही तर सगळा हिशोब करीन, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 


शांततेत बंद करा, मनोज जरांगेंचे आवाहन


मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, मी कुणालाही काहीही प्रोग्राम दिलेला नाही. समाज करणार असेल तर मी काय करू? आम्ही 13 महिने आंदोलन केलं. एवढं आंदोलन असतं का ? शांततेत बंद करा, आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू, असे त्यांनी म्हटले आहे. 


एसटीतून आरक्षण देऊ नका म्हटलं तर चालेल का?


लक्ष्मण हाके हे परळीवाले आणि भुजबळ यांच्यामुळे आंदोलनाला बसलेत. हे वडीगोद्रीतील लोकांच्या लक्षात आले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पंढरपूरला धनगर आंदोलन करताय आहेत. आम्ही तिथे बाजूला जाऊन बसलो तर चालेल का? ते काय लहान पोरं आहेत का? त्यांना एसटीतून आरक्षण देऊ नका म्हटलं तर चालेल का? पण आम्ही फुकट भांडण विकत घेत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी लक्ष्मण हाके यांच्यावर केली. तर तुला तुझ्या जातीचं प्रेसटीज आहे का? असा सवाल देखील त्यांनी हाके यांना विचारला. 


...तर तुमच्या आरक्षणाला आम्हीही विरोध करू शकतो


भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. खुनशीने आंदोलन आम्ही कधीच करत नाही. तुम्हीही करू नका. मराठ्यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या. बळजबरीने आमच्यात भांडण लावू नका, असा इशारा त्यांनी यावेळी ओबीसी आंदोलकांना दिला आहे. आम्ही जरी ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मात्र, धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आरक्षणाला आम्हीही विरोध करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.


मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा 


यावेळी आम्ही कठोर आंदोलन करणार आहोत. सगेसोयरे अंमलबजावणी करून टाका. तिन्ही गॅझेट लागू करा, सरसकट गुन्हे मागे घ्या, आम्हाला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. पण, दिलं नही तर तुमचं गणित बिघडवणार आहोत. फडणवीस म्हणतात जरांगे विरोधकांचा निवडणुकीत फायदा करून देतात. मग तुम्ही आमचा फायदा करून दिला नाही तर आमचा फायदा त्यांनाच होणार आहे. मी माझा जीव पणाला लावलाय तरीही फडणवीस यांना संधी दिलीय. हे मराठा समाज बघतोय. तुम्ही आरक्षण दिल नाही तर सगळाच मराठा समाजात फडणवीस दोषी असल्याचा संदेश जाणार आणि तुमचा खेळ खल्लास करणार, असा इशारा त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. 


आणखी वाचा 


Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल