Manoj Jarange Patil: सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उद्या (30 मे) पासून भर उन्हात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज दुपारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट देणार आहे. या भेटीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उन्हात जाळून घेणे सोपं नाही. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. ते एसीमध्ये बसतात. त्यांना या विषयाची मजा वाटते. पण, ही खूप मोठी अग्निपरीक्षा आहे. सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांची अग्निपरीक्षा घेतली नाही पाहिजे. याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं आहे. मी मंडप, कुलर लाऊन उपोषणाला बसलो असतो, पण स्वतःला समाजासाठी भाजून घेत आहे. हे सरकारला कळत नाही का? मी नियमात बोलतो तर मी माघार का घेणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करणे हे डोक्यात आणू नका, असा इशारा त्यांनी त्यावेळी दिलाय.
Manoj Jarange Patil: शिष्टमंडळात येऊ द्या. पण उद्याच्या आंदोलनावर ठाम
विरोधकांना टार्गेट करण्यासाठी मनोज जरांगेंचे आंदोलन आहे, असे वक्तव्य मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी केले होते. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, आता हा कोण आहे? चाटम... हा नवीनच आला आहे. त्याला नंतर बघू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. मात्र, आंदोलनाची गरज भासणार नाही असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, ठीक आहे बघूया त्यांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले आहे. शिष्टमंडळात येऊ द्या. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.
Manoj Jarange Patil: दहा महिन्यात काहीच सकारात्मक झाले नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार सकारात्मक आहे. सगळ्या मागण्यांवर तोडगा निघेल. याबाबत विचारले असता दहा महिन्यात काहीच सकारात्मक झाले नाही. आमचे वाटोळे झाले. मराठ्यांचे वाटोळे झाले याला जर सकारात्मक म्हणत असाल तर मग खरे आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
आणखी वाचा
