Ajay Baraskar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  हे गेल्या 18 दिवसापासून उपोषण करत आहेत. आज ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 19 सप्टेंबरपासून ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे, तरी देखील ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, या सर्व घटनांवर अजय महाराज बारस्कर (Ajay Baraskar)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेचे उपोषण मराठा आरक्षणासाठी की केवळ चौघांचे दाखले मिळवून देण्यासाठी आणि चौकशा थांबवण्यासाठी? असा सवाल बारस्करांनी केलाय. मनोज जरांगे पाटील नेमकं उपोषण कोणासाठी करतायेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Continues below advertisement

महाराष्ट्रातील मराठा समाजाने उपोषण करायला लावले नाही. त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर कोण जबाबदार आहे. दहीहंडे, पारवे, पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे हे लोक जबाबदार असल्याचे बारस्कर म्हणाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे बारस्कर म्हणाले.  

स्वतःच्या सहीचे मागण्यांचे सविस्तर निवेदन कुठे आहे? 

मनोज जरांगे यांचे उपोषण खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी असेल, तर त्यांच्या स्वतःच्या सहीचे मागण्यांचे सविस्तर निवेदन कुठे आहे? त्या निवेदनात नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आणि त्या सरकारकडे अधिकृतपणे कधी सादर करण्यात आल्या, हे समाजासमोर जाहीर करावे, अशी मागणी मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे. सरकारने आतापर्यंत कोणत्या मागण्या मान्य केल्या, कोणते निर्णय घेतले आणि कोणती कार्यवाही प्रलंबित आहे, याची कागदोपत्री माहिती जरांगे समाजासमोर का मांडत नाहीत? आंदोलन केवळ चार व्यक्तींना प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी तसेच ईडी व इतर यंत्रणांकडून सुरू असलेल्या कथित चौकशा थांबवण्यासाठी दबावतंत्र म्हणून केले जात आहे का?  याचे स्पष्ट उत्तर त्यांनी द्यावे, असेही बारस्कर यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील चौघांसाठी जीव धोक्यात घालत आहेत. 

Continues below advertisement

मनोज जरांगे यांच्याजवळ असणारी टोळीला विविध नोटीसा आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या नावावर त्यांनी मोठा पैसा कमावला आहे. या लोकांच्या गळावर फास लागले आहेत. त्यांनी अवैध पैसा कमावला आहे. त्यांची ई़डी चौकशी लागली आहे. ती चौकशी थांबवावी असा दबाव जरांगे पाटलांवर टाकत असल्याचे बारस्कार म्हणाले. जरांगेंच्या जीवाला धोका झाला तर कोण जबाबदार असे बारस्कर म्हणाले. 

केवळ चार प्रमाणपत्रांसाठी अथवा कोणत्याही चौकशा थांबवण्यासाठी मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाचा दबाव टाकून त्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पुरावे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध मनोज जरांगे यांचा जीव धोक्यात घालणे, उपोषणासाठी प्रवृत्त करणे आणि दबाव निर्माण करणे या आरोपांखाली कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे.