मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमध्ये कारवाई केल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई केली.

जालना : राज्यातील लाचखोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम सध्या एसीबीकडून (ACB) सुरू असून गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी करत लाखचोरांना रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे एसीबीने आज एकाच दिवशी दोन ठिकाणी धाड टाकत आधी पोलीस (Police) अंमलदारास 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तर, दुसऱ्या धाडीत थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना बीड एसीबीने रंगेहात अटक केली. तत्पूर्वी, जालना एसीबीने बीडमधील नेकनूर येथे जाऊन पोलीस अंमलदारास लाच घेताना अटक केली. या दोन्ही कारवायांमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमध्ये कारवाई केल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई केली. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी पोकलेन व ट्रक सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात ही लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एसीबीने लाचेची रक्कम तब्बल 6 लाख 40 हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण जेरबंद केले. याप्रकरणी, छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या कारवाईने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस अंमलदारास 10 हजार घेताना अटक
बीड जिल्ह्याच्या नेकनूरमधील पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत यांनी, काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेल, अशी धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता, त्याच बळवंत महोदयांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करुन सापळा रचला. त्यानुसार उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत अंमलदार बळवंत यांस 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















