जळगाव: जळगावमधील भडगाव शहरातील आदर्श कन्या विद्यालयाच्या नर्सरीतील दोन चार वर्षीय विद्यार्थ्यांचा नाल्यात (Jalgaon Accident News) बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेच्या प्रशासनावर दुर्लक्षावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भडगाव शहरातील ही मन सुन्न करणारी घटना आहे. आदर्श कन्या विद्यालयातील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे चार वर्षीय ज्ञानेश्वर मयंक वाघ व अंश सागर तहसीलदार (Jalgaon Accident News) हे दोन विद्यार्थी शाळेच्या परिसरालगत असलेल्या नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सुमारे ११ वाजता उघडकीस आली.(Jalgaon Accident News)
पुराच्या पाण्यामुळे शाळेच्या परिसराला संरक्षण देणारी भिंत कोसळली होती. याच नाल्याजवळ विद्यार्थ्यांची बाथरूम असल्याने तेथे गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा पाय घसरून नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला असून शाळा प्रशासनाच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर भडगाव शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या परिसरात आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याने निष्पाप चिमुकल्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप पालक आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. नाल्यालगत संरक्षण भिंत कोसळल्यानंतरही शाळा प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्याने हा अपघात टाळता आला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.