Jalgoan News : जात वैधता प्रमाणपत्र (cast Validity certificate) मिळवण्यासाठी तब्बल 19 वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती (scheduled Tribe) जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देऊनही तक्रारदार यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपिक, समिती सदस्यांसह मध्यस्थी करणारा अशा तीन जणांवर जळगावच्या (Jalgaon) लाच लुचपत विभागाने पथकाने कारवाई केली आहे.


नाशिकसह (Nashik) विभागात लाचखोरीचे (Bribe) प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वर्षाच्या शेवटच्या दिवशी देखील लाचखोरीचे प्रकरण समोर आले. जळगाव जिल्ह्यातील हे प्रकरण असून तक्रारदार हे फैजपूर येथे रहिवासी आहेत. तक्रारदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रकरण दिले होते. सततचा पाठपुरावा करूनही हे प्रकरण मार्गी लागत नव्हते. अशातच आता या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तक्रादाराकडे थेट लाचेची मागणी केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून यातील तिघांना अटक केली आहे. 


तक्रारदार हे अनुसूचीत जमाती (एस.टी.) प्रवर्गातील असून त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रकरण सादर केलेले होते. मागील 19 वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून देखील तक्रारदार यांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला सदर दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता. सदर न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंरही सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील संशयित क्रमांक 1 यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना दुसऱ्या दिवशी बोलावून घेवून तक्रारदार यांचे व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणुन देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरचे नावे सांगुन एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे 2 जात वैधता प्रमाणपत्राचे एकुण 10 लाख रुपये लाचेची मागणी केली. 


तसेच संशयित क्रमांक 2 यांनी तक्रारदार यांचे जात वैधता प्रमाणपत्रचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे संशयित क्रमांक 3  यास मध्यस्थी टाकून त्यांचे मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे 8 लाख रुपयाची मागणी केली. सदरचे पैसे आलोसे क्रमांक 3 कडे द्या असे सांगून स्वतःसाठी पैसे स्वीकारण्याची संमती दिली तसेच जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी नंदुरबार कार्यालयातील लिपिक खोसे यांना हजार दोन हजार रुपये देण्याबाबत तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले. तसेच संशयित क्रमांक 3 यांनी संशयित  क्रमांक 2 यांचे सांगण्यावरून आठ लाख रुपये संशयित क्रमांक 2 यांचे साठी स्वीकारण्याची संमती दर्शवली, तसेच सदर लाच मागणीस प्रोत्साहन दिले. संशयित क्र 1, 2 व 3 यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.