जळगाव : एकीकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी (Ladki bahin yojana)आम्हाला सरकारकडून पैसे मिळणे बंद झाल्याने संतप्त झाल्या आहेत. राज्यातील सुमारे 92 लाख लाडक्या बहिणींना विविध कारणास्तव योजनेचा लाभ मिळणे बंद झाले असून दुसरीकडे तब्बल दोन हजार महिलांना लाडकी बहीण योजना आम्हाला नको, असे म्हणत महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. एकावेळी एकच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार असल्याच्या शासनाच्या धोरणामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील महिलांनी हा निर्णय घेऊन शासनाला कळवले आहे.
जळगाव जिल्ह्यातील महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्याचं म्हटलं आहे. जळगावमधील या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला नको असल्याचे सांगत, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज दिले आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती, त्याला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यावेळी, सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची चाळणी केली नव्हती. मात्र, आता चाळणी होत असून लाखो महिलांना योजनेतून थेट वगळण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींनी युती सरकारला मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते. त्याच, लाडक्या बहिणींना आता योजनेची नियमावली आणि निकषांचा आधार घेत वगळण्यात येत आहे.
सरकारने सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करून 92 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या आहेत. त्यामध्ये, अनेक महिला केवायसी पूर्ण करू शकल्या नसल्याने बाद झाल्या आहेत, काही चारचाकी वाहनांमुळे, काही अडीचल लाखांची मर्यादा असल्याने योजनेतून बाद झाल्या आहेत. तर, दुसरीकडे काही महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असताना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते, त्याठिकाणी ते अर्ज मंजूर झाले असले, तरी एकाचवेळी एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याने महिलांनी ही योजना नाकारली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन हजार महिलांनी संजय गांधी योजनेचा लाभ आपण घेणार असल्याने, लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावी असा अर्ज जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाकडे केल्याचे जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी ऋषिकेश काळे यांनी म्हटले. दरम्यान, काही महिलांना तांत्रिक कारणास्तव केवायसी होऊनही योनजेचा लाभ मिळत नसल्याने, शासकीय कार्यालयात खेटे घालून त्या संताप व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
