Jalgaon Accident News: चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर महामार्गावर उलटला, चार ते पाच वाहने एकमेकांवर धडकली; जळगावात भीषण अपघात
Jalgaon Accident News: जळगाव शहराजवळील पाळधी–तरसोद नव्या बायपास महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.

Jalgaon Accident News: जळगाव शहराजवळील पाळधी–तरसोद नव्या बायपास महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावर उलटला आणि त्यानंतर चार ते पाच वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात दोन अवजड ट्रक आणि तीन कार यांचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Jalgaon Accident News: अपघात कसा घडला?
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर अचानक रस्त्यावर पलटी झाला. रात्रीचा काळोख आणि अचानक समोर आलेला उलटलेला कंटेनर टाळण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या वाहनांनी ब्रेक लावले; मात्र वेग जास्त असल्याने दोन ट्रक व तीन कार एकमेकांवर आदळल्या. काही वाहनांच्या काचा फुटल्या असून दोन कार पूर्णपणे चक्काचूर झाल्या आहेत.
Jalgaon Accident News: चार ते पाच जण जखमी
या अपघातात चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सुमारे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Sangamner Accident News: संगमनेरमध्ये भीषण अपघात, तीन जखमी
दरम्यान, संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी शिवारात शुक्रवारी दुपारी दोन चारचाकी वाहनांच्या झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. लोणीकडून संगमनेरच्या दिशेने जाणारी कार आणि संगमनेरकडून लोणीच्या दिशेने येणारी कार यांच्यात निमगाव जाळी शिवारात जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून गाड्यांमधील सुरक्षिततेच्या एअर बॅग्स वेळेवर उघडल्या गेल्या, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात लोणी येथील हॉटेल व्यावसायिक गणपत भोसले यांच्यासह संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रहाटळ आणि त्यांच्या समवेत असलेला एक जण असे एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. भोसले यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर दोन जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
आणखी वाचा
























