जळगाव : अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महामार्गावरील अपघातांच्या घटना कमी करण्याचं मोठं आव्हान रस्ते विभागाला आहे. दैनिक वर्तमानपत्रातून दररोज अपघाताच्या बातम्या येतात, मन सुन्न करणाऱ्या आणि मन हेलावून टाकणाऱ्या भीषण दुर्दैवी अपघाताच्या (Accident) घटना घडत आहेत. त्यातच, आता जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही ह्रदय पिळवटून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भीषण अपघातात आजोबांसह 6 वर्षीय नातू जागीच ठार झाला असून महिला गंभीर जखमी आहे. दुचाकी आणि भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक बसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यात पाळधी गावातील बायपासवरील कढोली फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रॉलामध्ये झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नुकत्याच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी जळगावला आलेले देशमुख चुनीलाल राठोड हे पत्नी बेबीबाई राठोड व नातू परेश राठोड यांच्यासह दुचाकीने गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॉलीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहनासह तो पाळधी पोलीस ठाण्यात आहे. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी, रुग्णालयाबाहेर नातेवाईक व कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
जळगावात बंद घर फोडून चोरी
जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील सिकवाल नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने लंपास केले. अनिल राजेश माळी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरुन एकूण 56,600 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी गेटचे स्टीलचे कुलूपही सोबत घेऊन चोरीनंतर ते पसार झाले. चोरीनंतर दुचाकीवरून पळ काढणारे तीन भामटे परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
