Deepak Kesarkar : आठवड्यातून दोनदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या उबेसाठी श्रध्दा आणि सबुरी विसरतात नसानसात गद्दारी भरलेल्यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साई बाबांची शक्ती मोठी आहे. ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे केसरकरांनी म्हटले आहे. 


दीपक केसरकर म्हणाले की, जेव्हा आम्ही एकत्र होतो आणि राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार तेव्हा मी एकटा आमदार होतो. ज्याला शिर्डीला जाण्याची परवानगी मिळाली. शिर्डीची (Shirdi) शाल उद्धव ठाकरे यांना पांघरली म्हणून ते मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची गाठ मी करून दिली. तिथे दिलेला शब्द तोडला नसता तर आज ही परिस्थिती आली नसती, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 


तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही


शेवटी जनतेला वस्तुस्थिती सांगा. सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्हाला राहायला जागा दिली नव्हती. गाड्यांमध्ये पेट्रोल दिलं नव्हतं. तेव्हा मी संघर्ष केला आणि शिवसेना तिथे आली. साईबाबांचे नाव घेऊन मला चॅलेंज करू नका, साई बाबांची शक्ती मोठी आहे. ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.


भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अहमदनगर येथील महाएल्गार मेळाव्यात त्यांनी 16 नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. याबाबत दीपक केसरकर म्हणाले की, भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत. वैचारिक मतभेद असतील तर चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील. 


समाजामध्ये एकता राहण्यासाठी जरांगेंची भूमिका महत्वाची


मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत दीपक केसरकर म्हणाले की, जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. समाजामध्ये एकता राहिली पाहिजे यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कुणबी दाखल्याचा आधार घेऊन लोकांना न्याय कसा मिळेल हे महत्त्वाचे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar : शरद पवारांवर थेट हल्लाबोल, भावनिक फूंकर; अजित पवारांनी बारामती लोकसभेला जाहीर शड्डू ठोकला!


चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय, अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा घणाघाती प्रहार