Cotton Prices : कापूस (cotton) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापूस खरेदीच्या मुहूर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना बाप्पा पावला असल्याचं मानलं जात आहे.  बोदवड बाजारपेठ कापसाला 16 हजारांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आहे. कापसाच्या दरात वाढ झाल्यानं सणासुदीत पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळाली आहे.


16 हजारांचा दर कायम राहण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा


जळगाव जिल्ह्यात बोदवड इथेही खरेदीचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी बोदवड बाजारपेठ विक्रमी असा सोळा हजार रुपये प्रति क्विंटल भाव काढण्यात आला आहे. मात्र, केवळ 67 किलो कापूस या ठिकाणी खरेदी करण्यात आला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मुहूर्ताला जास्तीचा भाव देत काही व्यापारी आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असले तरी पुढील कापूस खरेदी काळात मात्र हा भाव दिला जात नसल्याचा शेतकऱ्यांचा नेहमीच अनुभव राहिला आहे.
सोळा हजार हा भाव कायम राहणार नसला तरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव हा कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना यंदा बाप्पा पावला असेच म्हणता येणार आहे. दरम्यान, यंदा निघालेला भाव हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. जागतिक पातळीवर ही कापसाची आवक पाहता यंदा चांगले भाव राहतील, अशी शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.


जळगाव जिल्ह्यात केळीपाठोपाठ कापूस पीक महत्वाचे मानले जाते. कापूस पिकात सहसा शेतकऱ्यांना नुकसान येत नसल्यानं पांढरे सोनं म्हणून कापूस पिकांकडे पाहिले जाते. कापूस खरेदीचा हंगाम अजून सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्थी निमित्ताने कापूस खरेदी करण्याची खानदेशात परंपरा आहे. या परंपरेनुसार काल (31 ऑगस्ट) धरणगाव जिनिंग असो तर्फे कापूस खरेदी मुहूर्त करण्यात आला. 


कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळाला


बोदवड बाजारपेठ: 16000 रुपये
सातगाव डोंगरी : 14 हजार 772 रुपये
बाळद : 11 हजार 551 रुपये
धरणगाव : 11 हजार 153 रुपये
कासोदा : 11011 रुपये
कजगाव : 11000 रुपये


मागील वर्षी अतिवृष्टीचा कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र, कापसाचे पिक चांगले असल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडं अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण तिथे अनेक ठिकणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: