Delhi Flood : सध्या उत्तर भारतात (North India) जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालंआहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत (Yamuna River water level) पुन्हा वाढ झाली आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, पुरामुळं दिल्लीत वाढला आजारांचा धोका वाढला आहे.
उत्तर भारतातील अनेक भागात सध्आ जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूर आला आहे. हरियाणाच्या काही भागात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर यमुनेच्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे. दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीने चार दिवसांनंतर पुन्हा एकदा धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD अलर्ट) मंगळवारी दिल्लीत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आयएमडीच्या या इशाऱ्यानंतर दिल्लीत पुन्हा पूर येणार का? असा प्रश्न नागरिकांनी पडला आहे.
दिल्ली प्रशासन सतर्क
दिल्लीतील पुराचा सर्वाधिक फटका पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्लीला बसला आहे. पूर आणि पावसामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. सध्या त्याचा प्रभाव दिसत नसला तरी दिल्ली सरकारने या आजारांना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
यमुना नदीची पाणीपातळी 206 मीटरवर
सोमवारी सकाळी 11 वाजता यमुनेची पाण्याची पातळी 205.76 मीटर होती. सायंकाळी 5 वाजता 205.93 मीटर एवढी नोंद झाली. सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत यमुना नदीची पाणीपातळी 206 मीटरवर पोहोचली. जुना रेल्वे पूल (ORB) येथे यमुना नदीची जलपातळी 12 वाजता 205.75 मीटर नोंदवण्यात आली आहे. जी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी ट्विट केले की, "काल हरियाणातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज यमुनेच्या पाण्याची पातळी थोडीशी वाढत आहे. जोपर्यंत पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा खाली येत नाही तोपर्यंत मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी न परतण्याचे आवाहन केले. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सोमवारी पूरग्रस्त यमुनेतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला.
हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिमला हवामान केंद्राने जारी केलेल्या अंदाजात असे म्हटले की, बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांगडा, किन्नौर, कुल्लू, लाहौल स्पीती, मंडी, शिमला, सिरमौर, येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल. सोलन, उना येथे एक आणि दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, नैऋत्य मोसमी पावसाचा आणखी एक सक्रिय टप्पा या आठवड्यात सुरू होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: