Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांनी फरफटत नेत ताब्यात घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह ताब्यात घेतलेल्या काही कुस्तीपटूंची सुटका केली आहे. महिला कुस्तीपटूंनी बाहेर आल्यानंतर सुटका करण्यात आल्याची माहिती दिली. इतर काही कुस्तीपटू अजूनही अटकेत आहेत, अशी माहिती त्यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली. नव्या संसदेकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. तसेच जंतरमंतर आंदोलनही मोडित काढले आहे.


कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. कुस्तीपटू महिला महापंचायतसाठी नव्या संसदेच्या दिशेनं येत असताना पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले होते. ज्या पद्धतीने महिला कुस्तीपटूंना आंदोलन करताना हाताळण्यात आले, त्यावरून देशभरातील विरोधी पक्षांनी दिल्ली पोलिस आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. 






काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, आप, शेतकरी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध करत मोदी सरकारवर सडकून प्रहार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर हल्लाबोल केला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करताना  'राज्याभिषेक पूर्ण झाला, आता अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय' अशा बोचऱ्या शब्दात वार केला आहे. 


कुस्तीपटू आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की 


विनेश फोगट, तिची चुलत बहीण संगीता फोगट आणि साक्षी मलिक यांनी जंतरमंतर येथे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुस्तीपटू आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेचं लोकार्पण करत असताना भर रस्त्यात सुरु होता. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून कुस्तीपटूंना बसमध्ये भरून विविध ठिकाणी नेल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी जंतर मंतरवरील खाटा, गाद्या, कुलर, पंखे, ताडपत्री तसेच इतर पैलवानांचे सामान काढून टाकत तंबूही उखडून टाकले. 


नवीन संसद भवन, जंतर-मंतर आणि शेजारच्या राज्यांसह दिल्लीच्या सीमेजवळ सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि कुस्तीपटूंच्या निषेधात सामील होण्याची शक्यता असलेल्याअसलेल्या अनेक शेतकरी गटांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. बीकेयू नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी बंद गाझीपूर सीमेवर धरणे धरले. त्यांनी आंदोलक कुस्तीपटूंनी पुकारलेल्या निषेधामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.


इतर महत्वाच्या बातम्या