नवी दिल्ली : पतीच्याच दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्यावर गँगरेप केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. दिल्लीच्या चावला भागातील राहत्या घरात महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचं वृत्त आहे. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
पीडित महिलेचे गेल्या काही दिवसांपासून पतीसोबत घटस्फोटावरुन वाद सुरु आहेत. घटनेच्या दिवशीही खटके उडाल्यानंतर पतीने तिला तळमजल्यावरील खोलीत बंद केलं. पती पहिल्या मजल्यावरील खोलीत निघून गेला, मात्र त्याच्या दुकानात काम करणारा कमलेश नावाचा व्यक्ती खोलीत आला आणि त्याने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिने केली आहे.
आरडाओरड करुनही कोणी बचावासाठी आलं नसल्याचं विवाहितेने म्हटलं आहे. घटना घडली त्यावेळी आपण झोपलो होतो, असा दावा पतीने केला आहे. मात्र हे दुष्कृत्य पतीच्या संगनमताने झालं आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.