नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा फेब्रुवारी अखेरपर्यंत शिथील होण्याचे संकेत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पैसे काढण्यावरील मर्यादा पूर्णपणे उठवण्याची शक्यता आहे.


दररोज एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा आरबीआयने 10 हजार इतकी केली आहे. मात्र दर आठवड्याला सेव्हिंग्ज अकाऊण्टमधून जास्तीत जास्त 24 हजार रुपये, तर करंट अकाऊण्टमधून एक लाख रुपयेच काढता येऊ शकतात.

आरबीआयने लागू केलेली मर्यादा येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला शिथील होण्याची चिन्हं आहेत. देशातील नोटांचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत आहे, त्यामुळे ही शक्यता वाटत असल्याचं बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांनी पीटीआयला सांगितलं आहे.

हा पूर्णपणे रिझर्व्ह बँकेचा निर्णय आहे. फेब्रुवारी अखेरीस 78 ते 88 टक्के चलन बाजारात येईल, त्यामुळे पुढील दोन महिन्यात परिस्थिती नियंत्रणात असेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात.

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा सुरुवातीला दर दिवशी अडीच हजार रुपये इतकी होती. नोटाबंदीला 50 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर, म्हणजे 1 जानेवारीला ती 4500 रुपयांवर नेण्यात आली. त्यानंतर आठवड्याभराने ती दहा हजार रुपये इतकी करण्यात आली होती.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातील तत्कालीन नोटा बाद केल्या. नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत परत करण्यास किंवा बदलण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर एटीएम आणि बँकाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.