खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. एका व्यक्तीने फोटोंसह केलेल्या एका ट्विटला सुरेश प्रभूंनी रिट्वीट केलं आहे.
अंकुर सिंह यांनी रेल्वे ट्रॅकच्या क्लीप काढून टाकल्याचा फोटो शेअर करत मोदींच्या दौऱ्यापूर्वी रेल्वे अपघाताचा कट रचल्याचा दावा केला. यापूर्वीची रेल्वे दुर्घटनाही मोदींच्या दौऱ्यापूर्वीच झाली होती, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

या ट्वीटच्या आधारावर रेल्वे मंत्रालयालाही रेल्वे अपघाताचा कट रचल्याची शंका आहे. कारण यापूर्वीही कानपूरचे खासदार यांनी पुखराया येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागेही कट असल्याची शंका बोलून दाखवली होती.
काय आहे प्रकरण?
कानपूरमधील मंधाना येथे काही अज्ञातांनी रेल्वे ट्रॅक तोडून ठेवल्याच्या घटनेने चांगलीच खळबळ माजली. नारामऊ ते मंधाना स्टेशन दरम्यान 35 ते 40 क्लीप्स आणि जॉगल प्लेट खोलून ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी रेल्वे ट्रॅकही कापण्यात येत होता. मात्र पेट्रोलिंग पथकाला पाहून संबंधितांनी पळ काढला.
सुरेश प्रभुंकडून चौकशीचे आदेश
दरम्यान रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची तज्ञांकडून चौकशी केली जाईल, असं सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.