Who is Nitin Nabin: भाजपच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा बदल घडवत नितीन नबीन यांची पक्षाच्या संसदीय बोर्डाकडून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली. संघटनात्मक अनुभव, सातत्यपूर्ण राजकीय कारकीर्द आणि पक्षनिष्ठा या निकषांवर ही निवड झाल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, बिहारमध्ये नितीन नबीन यांची राजकीय कारकिर्द राहिली असली, तरी राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या नावाची चर्चा कधीच झाली नाही. जेव्हा जेव्हा भाजप अध्यक्षांची नावे चर्चेत आली तेव्हाही त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे आता कोणालाही माहीत नसताना नितीन नबीन यांना संधी कशी मिळाली? जे कालपर्यंत बाजूला होते त्यांच्याच स्वागताला उभं राहण्याची वेळ अनेकांवर आली. त्यामुळे नितीन नबीन आहेत तरी कोण? त्यांची पार्श्वभूमी आहे तरी काय हे जाणून घेणार आहोत. नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड ही भाजपच्या संघटनात्मक धोरणातील तरुण, अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्वाला दिलेली संधी म्हणून पाहिली जात आहे.
कोण आहेत नितीन निबीन?
सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन यांच्याकडे पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास आणि आवास विभाग ही महत्त्वाची खाती आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार असून, 2010 पासून सलग निवडणुकीत तेथून जनतेचा विश्वास मिळवत आले आहेत. याआधी त्यांनी भाजपचे छत्तीसगड प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राजकीय प्रवासाकडे पाहता, 2006 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पटना पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी बांकीपूर मतदारसंघात आपली पकड मजबूत केली. 2021 मध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच मंत्रीपद देण्यात आले. याशिवाय 2016 ते 2019 या काळात त्यांनी भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामाचा ठसा उमटवला.
घराणेशाहीतून राजकारणात, वडील भाजपचे आमदार
नितीन नबीन यांची राजकीय पार्श्वभूमी वारसाहक्काशी जोडलेली मानली जाते. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे आमदार होते. मात्र, संघटनात्मक कामातून स्वतःची ओळख निर्माण करत त्यांनी पक्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांचा कल सुरुवातीपासून राहिलेला असून, 2010 मधील एका घटनेमुळे त्यांची भूमिका त्या काळात चर्चेचा विषय ठरली होती. व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत, पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे वर्णन कर्मठ कार्यकर्ता असे करत संघटनेचा अनुभव आणि मेहनती वृत्ती अधोरेखित केली आहे. मे 1980 मध्ये रांची येथे जन्मलेले नितीन नबीन शिक्षणानुसार मॅट्रिक आणि इंटरपर्यंत शिक्षित असून, निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून नमूद केले आहे. त्यांच्यावर कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात दोष सिद्ध झालेला नसल्याची नोंदही प्रतिज्ञापत्रात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या