श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर तासभरही मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार टीकू शकलं नाही. काही मिनिटातच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला आणि जम्मू काश्मीरमधील सरकार पडलं. मात्र सरकार पडल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पुढील राजकीय स्थिती कशी असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्या मते, 'जम्मू-काश्मीरमध्ये सरकार पडल्याने आता तेथे जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेअंतर्गत राज्यपाल राजवट लागू केली जाऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. आता जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करायची का? राष्ट्रपती राजवट लागू करायची याचे सर्वस्वी अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपाल नामधारी प्रमुख असल्याने अप्रत्यक्षरित्या हे सर्व अधिकार केंद्र सरकारला आहे. जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार असले तरी 90 टक्के तरतुदी राज्यघटनेच्या लागू आहेत. त्यामुळे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना येथे कोणतेही निर्णय घेण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.'


'राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट लागू न झाल्यास तेथे येत्या ६ महिन्यात नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील, मात्र याबाबतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहेत', असंही उल्हास बापट सांगितले.