श्रीनगर: काश्मीरमध्ये अतिरेकी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. हिंसाचारादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रमाणात पेलेट गनचा वापर केला.


 

हे पेलेट गन जीव घेणारे नसले, तरी मरणासन्न करणारे ठरले आहेत. कारण या गनच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलक जखमी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पेलेट गनच्या छर्ऱ्यांमुळे  आंदोलकांना कायमचं अंधत्व येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

पेलेट गन नेमकी काय आहे?

पेलेट गन ही एक विशिष्ट प्रकारची बंदूक असून, यात वेगवेगळ्या प्रकारची काडतूसं वापरली जातात. या प्रकारच्या बंदुकीत 5 ते 12 च्या रेंजमध्ये काडतूसांची रचना असते. यातील पाचच्या रेंजमधील काडतूसं सर्वात घातक आणि वेगवान असतात. तसेच याचा पल्लाही खूप लांबचा असतो.

 

पेलेट गन मधून छोट्या आकाराचे लोखंडी छर्रे फायर केले जातात. हे लोखंडी छर्रे फार वेगवान असतात. एका काडतूसामध्ये 500 पर्यंत छर्रे असू शकतात.

 

फायर केल्यावर काडतूस हवेतच फुटून त्यातील छर्ऱे सर्व दिशांनी विखूरले जातात.

 

अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा

निशाण्यावर नेम लावून पेलेट गनने फायर करताच, त्यातील छर्रे चारही दिशांना पसरतात. आंदोलनावेळी याचा वापर फार घातक असून आपल्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यातील छर्रे लक्ष्य बनवतात आणि जखमी करतात.



पेलेट गन ही मुख्यत्वेकरून शिकारीसाठी वापरली जाते, कारण यातील छर्रे शिकारीचा अचूक वेध घेतात आणि शिकाऱ्याला सावज टिपण्यासाठी मदत होते. याच बंदुकीचा वापर काश्मीर खोऱ्यात आंदोलकांवर केला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.

 

जमावाला पांगवण्यासाठी पेलेट गन

काश्मीरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर, सुरक्षा रक्षकांनी पेलेट गनचा वापर केला. त्यामुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. जखमींची संख्या वाढल्यामुळे त्यांना उपचारासाठी काश्मीरबाहेर हलवण्यात येत आहे.

 

याशिवाय डोळ्यावरील उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवत असून, बाहेरील राज्यातून डॉक्टरांना पाचारण करण्यात येत आहे.