कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या लोकभवनच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सी. व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा कोणत्या कारणामुळं दिला हे अद्याप समोर आलं नाही. बोस जवळपास साडेतीन वर्ष पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. लोकभवनमधील सूत्रांच्या माहितीनुसार बोस यांनी दिल्लीत राजीनामा दिला आहे.
सी.व्ही. आनंद बोस यांनी 17 नोव्हेंबर 2022 ला पश्चिम बंगालचं राज्यपाल पद स्वीकारलं होतं. पीटीआय सोबत बोलताना त्यांनी राजीनामा दिल्याचं मान्य केलं आहे. ते म्हणाले की होय मी राजीनामा दिला आहे. बोस यांनी मात्र, राजीनाम्याचं कारण सांगितलं नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. बोस यांच्या अचानक राजीनाम्यामुळं हैराण आणि चिंताग्रस्त असल्याचं त्या म्हणाल्या. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ममता बॅनर्जी यांनी पोस्ट करत म्हटलं की पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्या राजीनाम्याच्या अचानक आलेल्या बातमीमुळं हैराण आणि चिंताग्रस्त आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की बोस यांच्या राजीनाम्याचं कारण मला अद्याप माहिती नाही. सध्याची परिस्थिती पाहता मला कोणतंही आश्चर्य वाटणार नाही कारण आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या तरी राजकीय फायद्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला असावा.
ममता बॅनर्जी पुढं म्हणाल्या की केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला सांगितलं की आर. एन. रवि यांना पश्चिम बंगालचं राज्यपाल करण्यात येत आहे. अमित शाह यांनी निश्चित परंपरेनुसार माझ्याशी सल्लामसलत केली नाही. अशा प्रकारची कामं भारतीय संविधानाच्या भावनेला कमजोर करतात आणि आपल्या संघराज्य रचनेवर हल्ला करतात. केंद्र सरकारनं को ऑपरेटिव्ह फेडरलिझ्मच्या सिद्धांताचा सन्मान केला पाहिजे. अशा प्रकारचे एकतर्फी निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे जे लोकशाही पद्धती आणि राज्यांच्या सन्मानाला कमी करतात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार लडाखचे उपराज्यपाल कवींद्र गुप्ता यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आणखी काही राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल राजीनामा देऊ शकतात.
