West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमधील राजकारण सध्या चांगलेच तापलेले असताना, कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) एक मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे निवासस्थान आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, त्या कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (OC) इन्स्पेक्टर गौतम दास (Gautam Das) यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टमुळे ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जागी आता इन्स्पेक्टर चमेली मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
West Bengal Election 2026: नेमकं प्रकरण काय?
नुकतेच नियुक्त झालेले इन्स्पेक्टर गौतम दास यांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते एका अत्याधुनिक शस्त्रासह (बंदूक) दिसत होते आणि त्याखाली त्यांनी “Ready For New Assignment” (नवीन जबाबदारीसाठी तयार) असे कॅप्शन दिले होते.
ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघाचा काही भाग आणि खुद्द मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कालीघाट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. अशा संवेदनशील भागात तैनात असलेल्या अधिकाऱ्याने शस्त्रासह अशा प्रकारचे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
West Bengal Election 2026: तृणमूल काँग्रेसची आक्रमक भूमिका
गौतम दास यांच्या या पोस्टवर तृणमूल काँग्रेसने (TMC) तीव्र आक्षेप घेतला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश मजूमदार यांनी हा मुद्दा उचलून धरत मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि कोलकाता पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र लिहून तक्रार केली. निवडणुकीच्या वातावरणात अशा प्रकारची पोस्ट करणे संशयास्पद असल्याचे टीएमसीने म्हटले होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या संतापानंतर आणि पक्षाच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत दास यांना निलंबित केले.
West Bengal Election 2026: दोन विधानसभा मतदारसंघात झाले पुन्हा मतदान
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील मगराहाट पश्चिम (11 केंद्र) आणि डायमंड हार्बर (4 केंद्र) या दोन विधानसभा मतदारसंघांतील एकूण 15 मतदान केंद्रांवर शनिवारी पुनर्मतदान पार पडले. 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेत विशेष पर्यवेक्षक सुब्रत गुप्ता यांच्या अहवालानुसार पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला. 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
