मुंबई : विधानसभा निवडणुकीकरता आता पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापताना दिसत आहे. तृणमुल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला असो किंवा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. आम्ही 200 जागा पार करू हा भाजपचा दावा असताना रणनितीकार प्रशांत किशोर यांनी तर, 'भाजप 10 जागा देखील पश्चिम बंगालमध्ये जिंकणार नाही. भाजपनं दोन अंकी आकडा पार केल्यास मी ट्विटर सोडेन' असं ट्विट केल्यानं यानंतर एका वेगळ्या चर्चेला सुरूवात झाली आहे.


निवडणुका, मग त्या ग्रामपंचायतीच्या असोत, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या, विधानसभेच्या किंवा अगदी लोकसभेच्या. आरोप - प्रत्यारोप हे आलेच. सध्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये जोरदार आरोप - प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 'अबकी बार दोसो पार' असा नारा दिलाय. तर प्रशांत किशोर यांनी भाजप 10 जागा देखील पश्चिम बंगालमध्ये जिंकणार नाही. भाजपनं दोन अंकी आकडा पार केल्यास मी ट्विटर सोडेन' असं म्हटल्यानं सध्या त्याबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत.


याबाबत दिल्लीतील राजकीय विश्लेषक अशोक वानखडे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी 'पश्चिम बंगालमधी सध्याची परिस्थिती पाहता भाजप दोनशेच्यावर जाणार नाही आणि प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार भाजपला 10 पेक्षा कमी जागा मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.


'सध्याची पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती पाहता भाजप दोन नंबरला राहिल. सध्या पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसची रिकामी असलेली जागा भाजप भरून काढेल. शिवाय, ही निवडणूक ही तृणमुल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत असेल. जे. पी, नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचं भाजपकडून केलं जात असलेलं राजकारण पाहता यामध्ये संशयाला वाव आहे. यापूर्वी भाजपकडून अशाच प्रकारचे हल्ले आणि त्याचं राजकारण झालेलं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधीपक्षामध्ये दिसेल. तृणमुल काँग्रेसनं सर्व्हे केला असून या सर्व्हेअंती 35 जणांचं तिकिट कापलं जाणार आहे. आणि ज्यांचं तिकिट कापलं जाणार आहे. तेच लोक सध्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. एकंदरीत हा प्रवेश तृणमुल काँग्रेसच्या पथ्यावर पडेल असा मतप्रवाह पक्षात दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची मतं ही मोठ्या प्रमाणावर ममतांच्या मागे गेली आणि हीच मतं ज्यावेळी भाजपकडे वळतील तेव्हा भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येईल.


सध्याची पश्चिम बंगालमधील स्थिती पाहता लोकांना अपिल करील असा कोणताही चेहरा नाही. ममता मास लिडर असल्यानं त्यांच्यामागे लोकं गेली. यामध्ये एक प्रश्न नक्की पडतो की भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? ममता या रस्त्यावर उतरून लढल्या आहेत. देशात ज्याप्रमाणे मोदी त्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता या ब्रँड आहेत ही बाब देखील लक्षात घ्यायला हवी. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेलं राजकारण पाहता ममता सध्या केंद्राकडून कशाप्रकारे त्रास दिला जातो हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता या बंगाली अस्मितेवर तर भाजप हिंदू - मुस्लिम असं राजकारण करतात याकडे देखील आपलं लक्ष दिलं पाहिजे. कारण बंगालमध्ये बंगाली अस्मितेला देखील तितकंच महत्त्व आहे अशी प्रतिक्रिया देखील अशोक वानखेडे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. तसेच लोकसभेत मिळालेली मतं ही विधानसभेत मिळतील असं नाही याकडे देखील वानखेडे यांनी लक्ष वेधलं. त्यासाठी त्यांनी बिहारमधील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यामधील मतांकडे पाहता येईल अशी पुष्टी केली.


तर, यावर पश्चिम बंगालमधील राजकीय विश्लेषक बिश्वनाथ चक्रवर्ती यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी 'भाजप आणि अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करायला सुरूवात केली. याचा परिणाम तृणमुल काँग्रेसवर झाला. प्रसारमाध्यमांमध्ये देखील त्यावर मोठी चर्चा झाली. याचा परिणाम हा मतांवर देखील होतो. त्यामुळे हा दावा खोडून काढण्यासाठी, तृणमुल काँग्रेसवर झालेला परिणाम पाहता प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं. सारासार विचार केला तर त्यामध्ये ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. कारण त्यांच्या या ट्विटनंतर प्रसारमाध्यमांच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर सर्वत्र तिच चर्चा रंगली. प्रशांत किशोर यांनी त्याच उद्देशानं हे ट्विट केलं होतं. अमित शहा यांनी बोलपूर येथे काढलेली रॅली आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यामुळे एक वेगळंच राजकीय वातावरण आणि वेगळाच राजकीय अंदाज पश्चिम बंगालमध्ये बांधला जात होता. या साऱ्यावर देखील प्रशांत किशोर यांच्या ट्विटच्या परिणाम झाल्याचं दिसून येतं.


पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाऊ अभिषेक बॅनर्जी यांच्या राजकारणावर देखील वारंवार टीका केली जात होती. त्याचा परिणाम देखील तृणमुल काँग्रेसवर होत होता. पण, किशोर यांच्या ट्विटनं यावरच्या चर्चा देखील कमी झाली. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या ट्विटनं एका दगडात तीन पक्षी मारले असं नक्कीच म्हणता येईल. सध्याची परिस्थिती पाहता बंगालमध्ये कोण जिंकेल? कोण किती जागा जिंकेल हे सांगता येत नाही. पण, सीएए आणि एनआरसी हे दोन प्रमुख मुद्दे निवडणुकीकरता महत्त्वाचे असतील. यामध्ये मतांचं विभाजन होईल आणि याचा फायदा कोण उचलतं आणि तो कुणाला होतो? हे पाहावं लागणार आहे. अद्याप प्रचार सुरू झालेला नाही. त्यामध्ये कोणत्या मुद्यांवर भर दिला जातो हे पाहावं लागेल. शिवाय, बंडखोर आणि त्यांना मिळणारी मतं देखील यामध्ये महत्त्वाची ठरतील' अशी प्रतिक्रिया त्यांनी 'माझा'शी बोलताना दिली.


तर त्याच वेळेला पश्चिम बंगालमधील राजकीय विश्लेषक असलेल्या अमल मुखर्जी यांनी मात्र प्रशांत किशोर यांच्या दाव्यावर थेट टिका केली आहे. 'प्रशांत किशोर हे तृणमुल काँग्रेससाठी राजकीय रणनितीकार आहेत. त्यांना त्याबदल्यात चांगले पैसे मिळत आहेत. त्यामुळे ते सध्या त्यांचं काम करत आहेत. पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती ही वेगळीच आहे. प्रशांत किशोर यांनी केलेलं हे विधान एकतर्फी आहे. त्याला इतकं महत्त्व देण्याची गरज आहे. भाजपची कामगिरी यावेळी मागच्यावेळीपेक्षा चांगली असेल. पण, याचा अर्थ असा नक्कीच नाही की भाजप जिंकेल आणि तृणमुल हरेल. पण, यामध्ये अपेक्षित असं जनमत कुणाला मिळेल हे पाहावं लागेल.'
अद्याप तरी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे राजकीय वारे वाहत आहे. त्यामुळे निकालाअंती पश्चिम बंगालच्या जनतेचं मत कुणाला आणि कोणत्या मुद्यावर दिलं गेलंय हे स्पष्ट होईल.