Weather Update News : सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं काही भागातील नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 22 जुलैपर्यंत उत्तर भारतात पावसाचा जोर कायम राहणार आहे.  


उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला मोठा फटका


उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नदी, नाले, तलाव पाण्याने भरले आहेत. काही भागात पुराचे पाणी घरांमध्ये शिरलं आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशातील नद्यांनी पूर आला आहे. या पावसामुळं हजारो कोटी रुपयांयं नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशचे 4635.58 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू 


अतिवृष्टीमुळं हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 122 जणांना मृत्यू झाला आहे. राज्यभरात पावसामुळे 490 घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे तर 4 हजार 146 घरांचे अंशत: नुकसान झाले. पावसामुळे 133 दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. तर 943 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. 24 जूनपासून हिमाचल प्रदेशात 56 भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, 43 ठिकाणी पूर आला आहे. 


दिल्लीत मुसळधार पाऊस


दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीतील पुराचा सर्वाधिक फटका पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्लीला बसला आहे. पूर आणि पावसामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. सध्या त्याचा प्रभाव दिसत नसला तरी दिल्ली सरकारने या आजारांना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यमुना नदीची पाणीपातळी 206 मीटरवर पोहोचली. जुना रेल्वे पूल (ORB) येथे यमुना नदीची जलपातळी 12 वाजता 205.75 मीटर नोंदवण्यात आली आहे. जी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी ट्विट केले की, "काल हरियाणातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज यमुनेच्या पाण्याची पातळी थोडीशी वाढत आहे. जोपर्यंत पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा खाली येत नाही तोपर्यंत मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी न परतण्याचे आवाहन केले. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसह पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट