Weather Today Updates : मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून (Heat) काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या आठवड्यापासून उष्णतेने कहर केला आहे. हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने विक्रम मोडीत काढला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी (14 मे) राष्ट्रीय राजधानीसह बहुतांश राज्यांमध्ये हवामानाचे स्वरुप पुन्हा एकदा बदलू शकतं.


महाराष्ट्रात पारा वाढलेला राहणार


महाराष्ट्रात (Maharashtra) रखरखत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागात पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो. हवामान खात्याने देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. 


वादळ आणि हलक्या पावसाचा अंदाज


हवामान खात्याच्या मते, आज (14 मे) दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तिथे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय जोरदार वादळ आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे. नागौर, जयपूर, चुरु, बिकानेर, जैसलमेर, दौसा, करौली जिल्हे आणि राजस्थानच्या आसपासच्या परिसरात काही ठिकाणी वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.






14 मे रोजी पावसाची शक्यता


आज, 14 मे रोजी यूपीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्याच्या काही ठिकाणी आणि उर्वरित डोंगराळ भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील मैदानी भागात हवामान कोरडे राहील. हवामान खात्यानुसार, त्रिपुरा आणि मिझोराममध्ये 14 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम, नागालँड आणि मणिपूरच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. बिहारमध्ये रविवार 14 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ओदिशा, पश्चिम बंगालमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.