Weather Update: देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच काही भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्याआहेत. विशेषत: उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
हवामान खात्याने आज देशातील विविध राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण-गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच बिहार, हरियाणा, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दुसरीकडे लडाखच्या लेहमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यापावसामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस
मध्य प्रदेशात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. राजधानी भोपाळजवळील सिहोर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सिहोर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे कोलार धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत आहे. सिहोर जिल्हा प्रशासनाकडून कोलार धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी धरण परिसरात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस
पंजाब आणि हरियाणामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागानं आज पुन्हा हरियाणातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर हरियाणातील 593 गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. 33 शहरेही पुराच्या विळख्यात सापडली आहेत. त्याचवेळी पुरानंतर पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याचा धोका वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: