केरळ: केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर तरुणीनं गर्दीने भरलेल्या बसमध्ये लागलेल्या धक्क्यानंतर केलेल्या आरोपांनंतर एका ४२ वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक (Crime News) घटना घडली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीच या आत्महत्या केलेल्या दीपक यू नावाच्या तरुणाने प्रवाशांनी तुडूंब भरलेल्या बसमध्ये एका तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झालेला होता. दीपकच्या कुटुंबियांनी त्या तरुणीने केलेले आरोप खोटे असल्याचे आणि केवळ व्ह्यूज, पैशांसाठी व्हिडीओ बनवलं असल्याचं म्हटलं होतं.(man end his life after woman alleges misbehaviour)
शिमजिथा मुस्तफा या व्हिडीओ इन्फ्लुएन्सरने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बसमधून प्रवास करताना तरुणाने चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप तिने केलेला होता. तिचा हा आरोपांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्या तरूणाचं नाव दीपक यू असं आहे, तो पुथियारा या ठिकाणी त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होता.
नेमकं काय घडलं?
दीपक १६ जानेवारी रोजी कामासाठी कन्नूरला गेला होता. तिथून तो पय्यानूर रेल्वे स्थानकातून अरिकोडला जाणाऱ्या खासगी बसने प्रवास करत असतानाच त्याच बसमध्ये शिमजिथा मुस्तफा देखील प्रवास करत होती. शिमजिथाने बसमध्ये एक १८ सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं आरोप केला होता की, दीपकने जाणीवपूर्वक तिला अश्लील स्पर्श केला आहे. दरम्यान, दीपकच्या कुटुंबियांनी याबाबत बोलताना त्याने जाणीवपूर्वक नाही तर गर्दीत चुकून लागलेला धक्का असल्याचं म्हटलं आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानं दीपक मानसिक तणावाखाली
या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यानंतर दीपक मानसिक तणावाखाली गेला होती. दोन दिवस त्याने काही खाल्लंही नाही. रविवारी सकाळच्या सुमारास ७ वाजता आई-वडील त्याला उठवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेले पण त्याने दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याच्या रूमचा दरवाजा तोडला असता दीपकने रूममध्ये गळफास घेतल्याचं आढळून आलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले असून व्हायरल व्हिडीओच्या दृष्टीकोनातूनही तपास केला जाणार आहे.
अपमान झाल्याच्या भावनेनं तो अस्वस्थ
या घटनेनंतर दीपकच्या कुटुंबियांनी महिला इन्फ्लुएन्सरने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच्या वडिलांनी म्हटलं की, आमचा मुलगा निर्दोष होता. तो असं करूच शकत नाही. व्हिडीओ व्हायरल होताच अपमान झाल्याच्या भावनेनं तो अस्वस्थ झाला होता होता. त्याचं कशातही लक्ष नव्हतं, तो खातही नव्हता, याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू आणि न्याय मागू. व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपक कोणाशीच बोलला नव्हता. त्यानं स्वत:ला खोलीत बंद करून घेतल्याचंही कुटुंबियांनी सांगितलं. या घटनेनंतर शिमजिथाने आणखी एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. आपण आपल्या आरोपांवर ठाम असून दीपकने जाणीवपूर्वक स्पर्श केल्याचं म्हटलंय. मात्र दीपकचा आधीचा व्हिडीओ तिने डिलिट केला.
