नवी दिल्ली: गुरुवारी भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून सात दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्यानंतर संपूर्ण देशात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला. कारण भारतीय सैन्यदलाने उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांच्या हौतात्म्याचा वचपा काढला होता.


पण यानंतर सोशल मीडियावरुन एक फोटो व्हायरल कमालीचा होत आहे. या फोटोत दिसणारे जवान सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होत असताना भारतीय सैन्यदलाच्या या सहसाला आभिवादन केले जात असले तरी हा फोटो खरंच त्याच जवानांचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन् हा फोटो जर खरंच त्या जवानांचा असेल, तर असा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होणे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण यामुळे या जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

पण जर हा फोटो चुकीचा असेल, तर या पाठीमागचे सत्यही समोर येणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जर हे जवान सैन्यदलाच्या दुसऱ्या कोणत्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले असतील, अन् त्याचा संबंध सर्जिकल स्ट्राईकशी जोडल्यानेही त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.

या फोटोच्या सत्यतेची पडताळणी एबीपी न्यूज टीमचे प्रतिनिधी नीरज राजपूत यांनी केली. त्यांनी हे फोटो काही सैन्यदल आणि वायूदलाच्या अधिकाऱ्यांना दाखवले. वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जवान एका मिलिट्री ट्रान्सपोर्ट विमानात दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो चुकीचा असल्याचा पहिला पुरावा त्यांनी दिला. कारण, पीओकेवर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवेळी स्पेशल फोर्स कमांडोजनी कोणत्याही विमानाचा वापर केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईकसाठी हे कमांडो जम्मू-काश्मीरमधील सैन्यदलाच्या उत्तरेकडील दोन गुप्त ठिकाणातून एलओसीपर्यंत हेलिकॉप्टरमधून गेले. यानंतर हे जवान एलओसीवर हॅलिकॉप्टरमधून उतरुन सरपटत पीओकेमध्ये दाखल झाले होते.

त्यामुळे सैन्यदलाच्या सूत्रांनी हा फोटो पाहताक्षणीच तो बोगस असल्याचे सांगितलं. या फोटोतील जवानांनी जे हेलमेट वापरले आहे, तेही एखाद्या मिलिट्री एअरक्राफ्टमधून पॅरा जम्पिंगवेळी वापरले जाते. तेव्हा 28-29 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अशा कोणत्याही एअरक्राफ्टचा वापर केला नव्हता, हे ही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एबीपी न्यूजच्या या पडताळणीत व्हायरल होणारा फोटो चुकीचा असल्याचं उघड झालं आहे.



तसेच आपणा सर्वांना अशा प्रकारचे मिलिट्री ऑपरेशनचे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल करु नयेत असं आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत. कारण असे करण्याने जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.