Voilence in West Bengal: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शन होत आहे. अशातच बंगालमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या आंदोलनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा आंदोलकांनी नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक करून लोकल ट्रेनचे नुकसान केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक केली.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण रेल्वे स्थानकात घुसले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने प्लॅटफॉर्मवर धावणाऱ्या ट्रेनवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे लालगोला मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.


10 जून रोजी अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने


दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 10 जून रोजी पश्चिम बंगालमधील हावडासह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने पाहायला मिळाली. मात्र आता हावडामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याची बातमी समोर आली आहे. येथे जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती पाहता येथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.


दिल्ली हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक 


दरम्यान, दिल्लीतील जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोहम्मद फहीम खान आणि निसार अहमद नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. इतर आरोपींना ओळखण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल फोन वापरून बनवलेले व्हिडीओ देखील स्कॅन करत आहेत. या दोघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली असून जामा मस्जिद परिसरात राहणारा मोहम्मद नदीम (43) आणि तुर्कमान गेट परिसरात राहणारा फहीम (37) अशी त्यांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.