नवी दिल्ली : भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला उद्योगपती विजय माल्ल्याने भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. भारतात येऊन कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारी माल्ल्या असल्याचे बोलले जात आहे.

माल्ल्यावर सध्या लंडनमधील कोर्टात प्रत्यार्पणाचा खटला सुरु आहे. त्यावेळी भारतीय अधिकाऱ्यांना माल्ल्याने अप्रत्यक्ष संकेत दिले की, तो भारतात येऊन कायदेशीर लढाई लढेल. मात्र तपास यंत्रणेतील सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात येण्यासंबंधी माल्ल्याने अद्याप नीट स्पष्ट केले नाही, शिवाय यावर बोलण्यासही त्याने नकार दिला आहे.

आर्थिक घोटाळा करुन परदेशात पळणाऱ्यांविरोधात नुकतेच जारी करण्यात आलेल्या अध्यादेशान्वये सरकार माल्ल्याच्या भारत आणि परदेशातील संपत्ती जप्त करु शकतं.

मुंबईतील पीएमएलए कोर्टाने गेल्या महिन्यात समन्स जारी करत, माल्ल्याला 27 ऑगस्टपर्यंत कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले होते. तर ईडीने 9 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी नव्या अध्यादेशान्वये माल्ल्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.

केंद्रीय तपास यंत्रणांनी माल्ल्याच्या जवळपास 12 हजार 500 कोटी रुपयांची संपत्ती तातडीने जप्त करण्यासाठी कोर्टात विनंती केली आहे.