नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत केवळ दोन दिवस राहिली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 21 ऑगस्ट आहे, तर मतदानाचा दिवस 9 सप्टेंबर आहे. भाजपप्रणित एनडीएनं सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, इंडिया आघाडीनं माजी न्यायमूर्ती बी.सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वीच्या पाच निवडणुकांमध्ये काय घडलं होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.
2002 मध्ये भैरवसिंह शेखावत विजयी
2002 मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वातील रालोआचं सरकार होतं. तेव्हा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते भैरवसिंह शेखावत यांना उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हा काँग्रेसनं सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिलीहोती. भैरवसिंह शेखावत यांनी सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता. उपराष्ट्रपती होणारे ते भाजपशी संबंधित पहिले व्यक्ती होते. 2007 मध्ये त्यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली त्यात ते पराभूत झाले.
2007, 2012 मध्ये हमीद अन्सारींचा विजय
2004 मध्ये केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार आलं. 2007 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत यूपीएनं हमीद अन्सारी यांना तर भाजपनं नजमा हेपतुल्ला आणि सपानं राशिद मसूद यांना उमेदवारी दिली होती. हमीद अन्सारी यांनी त्या निवडणुकीत विजय मिळवला. हमीद अन्सारी यांनी 2012 मध्ये विजय मिळवला,त्यांनी भाजपच्या यशवंत सिंह यांचा पराभव केला.
2017 मध्ये व्यंकय्या नायडूंचा विजय
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात भाजपचं सरकार आलं. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी जाहीर केली. विरोधकांनी गोपाल कृष्ण गांधी यांना उमदेवारी दिली होती. व्यंकय्या नायडू यांनी गोपाल कृष्ण गांधी यांचा पराभव केला.
2022 मध्ये जगदीप धनखड यांचा विजय
2022 मध्ये एनडीएकडून जगदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली होती. विरोधी पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली होती. जगदीप धनखड उपराष्ट्रपती होण्यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी राजीनामा दिल्यानं आता निवडणूक जाहीर झाली आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. सध्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून 782 खासदार आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला 392 मतांची गरज आहे. एनडीएकडे 427 तर इंडिया आघाडीकडे 355 खासदारांचं संख्याबळ आहे.