मुंबई : अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Savarkar) यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार (Ashish shelar) यांनी आज अंदमान निकोबार चे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. मंत्री आशिष शेलार आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी  सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ज्या काळ कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते तिथे जाऊन आशिष शेलार नतमस्तक ही झाले. दरम्यान त्यांनी या दौऱ्यात अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. 

ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे. यापूर्वी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांना विनंती पत्र लिहून शेलार यांनी हा विषय केंद्र सरकारकडेही मांडला होता. याबाबत स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची भूमिका व संकल्पना अधिक स्पष्टपणे विषद करता यावी म्हणून आज शेलार यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिवांची भेट घेतली.

पुतळ्यासह डिजिटल संग्रहालय, माहिती केंद्र

महाराष्ट्र शसानाने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे, त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारा भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे. महाराष्ट्र सरकार या स्मारकाच्या उभारणीत पूर्णपणे कटिबद्ध असून,  स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास हे स्मारक उभे राहू शकेल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

24 डिसेंबर 1910 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. जूनमध्ये सावरकरांची रवानगी अंदमानला झाली, जिथे त्यांना 50 वर्षं काढायची होती. अंदमानच्या तुरुंगाबद्दल अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या, पण ज्यावेळी सावरकर तिथे पोहोचले तेव्हा त्यांना अंदमानवर काही ओळी सुचल्या होत्या. 

मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले

फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले

अर्थात, या देशावर प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल. आपल्या भारताच्या भरभराटाची स्वप्न पूर्ण होईल पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल. 

हेही वाचा

टीम इंडियाच्या आजच्या स्तरावरील क्रिकेटचं श्रेय पवार साहेबांचं; वानखेडेवर फडणवीसांची जोरदार 'बॅटींग'