मुंबई: येत्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला विरोधकांच्या इंडिया आघाडीत (I.N.D.I.A ) आणखी एका नव्या पक्षाचा समावेश होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची मान्यता असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  पुढाकार घेऊन प्रमुख नेत्यांची चर्चा केल्याची माहिती आहे. 


विरोधकांच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच राष्ट्रावदीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भात बैठक घेऊन 28 डिसेंबरनंतर त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एका संयुक्त बैठकीचं आयोजन केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


इंडिया आघाडीच्या निर्णयानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. 


वंचितला इंडिया आघाडीचा भाग करावा यासाठी आपण स्वतः मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. त्यामुळे वंचितचे इंडिया आघाडीमध्ये समावेश हा पक्का असल्याची चर्चा आहे. 


वंचित आघाडीची बैठक


तिकडे वंचित आघाडीने 26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक बोलावली आहे. प्रकाश आंबेडकरांनी राज्य कमिटीच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 जागांवर पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील 20 दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती. 


सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल 


तिकडे सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधील कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निर्धार मेळाव्यात I.N.D.I.A. आघाडीवर तुफान हल्ला चढवला होता. तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू, असं सुजात आंबेडकर म्हणाले. "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावर सुजात आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


ही बातमी वाचा: