मुंबई : 'पारस ऑफिशियल' नावाचे स्वत:चे युट्यूब चॅनेल चालवणारा प्रसिद्ध यू ट्यूबर पारस सिंह यांने अलीकडेच अरुणाचल प्रदेशचे आमदार निनॉंग इरिंग यांच्याबद्दल वर्णद्वेषी टिपण्णी केली होती. निनाँग इरिंग भारतीय नाहीत (नॉन इंडियन), तसेच अरुणाचल प्रदेश देखील भारतात नसल्याचं भाष्य पारसने केलं होतं. यावर बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि राजकुमार राव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पारस सिंग याच्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी पारस सिंहला पोलिसांनी अटक केली आहे.
पारस सिंहने नुकताच एक व्हिडिओ पब्लिश केला होता. त्यात अरुणाचल प्रदेशचे आमदार निनॉंग इरिंग हे एक भारतीय नसलेले व्यक्ती असल्याचे वर्णन केलं होतं. तसेच अरुणाचल प्रदेश हा देखील चीनचा एक भाग आहे आणि हे राज्य भारताचा भाग नाही, असं पारसने म्हटलं होतं.
पारसच्या या व्हिडीओनंतर अभिनेता वरुण धवनने सोशल मीडियावर लिहिले की, "आपल्या देशाबद्दल आणि देशातील प्रदेशाबद्दलचे हे अज्ञान मूर्खपणा आहे. परंतु हे अज्ञान आक्षेपार्ह मार्गाने मांडताना विषारी ठरते. आपल्याला एकत्रपणे यावर टीका केली पाहिजे आणि असं खपवून घेतलं जाणार नाही हे ठणकावत सांगितलं पाहिजे. अरुणाचल प्रदेशात इतका वेळ घालवल्यानंतर तो देशाचा भाग नसल्याचा विचार करणे अत्यंत मूर्खपणाचे आहे. हे किती चुकीचं आहे हे स्वत: ला आणि इतरांना शिकवण्याची वेळ आली आहे. वरुणनंतर अभिनेता राजकुमार रावने देखील यावर आक्षेप नोंदवला आहे.
आपल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर उठलेलं वादंग आणि टीका पाहून पारस सिंहने हा व्हिडीओ पारसने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून काढून टाकला आहे. तसेच त्याने केलेल्या विवादास्पद टिपण्ण्यांबद्दल माफी मागितली आहे. सोशल मीडियावरूनही त्याने हा वादग्रस्त व्हिडीओ हटवला आहे.
पारस सिंहच्या आईनेही हात जोडून आपल्या मुलाच्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि आपल्या मुलाला माफ करण्याची विनंती केली. मंगळवारी पंजाब पोलिसांनी पारसवर कारवाई करून त्याला अटक केली. पारसच्या अटकेनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या ट्विटरवर पंजाबहून अरुणाचल प्रदेशात आणण्याच्या प्रक्रियेसंदर्भात असे लिहिले आहे की, अशा लोकांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.
वरुण धवनने काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या आगामी 'भेडिया' चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचं अतिशय सुंदर राज्य म्हणून वर्णन वरुणने केलं होतं.