Vadodara Boat Accident: गुजरातच्या (Gujarat) वडोदरामध्ये (Vadodara) बोट तलावात उलटून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. वडोदरामधील हरणी तलावातील दुर्घटना घडली असून गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


गुजरातमधील वडोदरा येथे गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील मुलं शाळेच्या सहलीसाठी आली होती. मात्र, काळानं घाला घातला आणि ही सहल विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरली. वडोदराच्या हरणी तलावात विद्यार्थी बोटिंग करत होते त्याचवेळी हा अपघात घडला. तलावाच्या मध्यभागी बोट बुडाली आणि दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी उशिरा याप्रकरणी कारवाईही करण्यात आली असून हर्णी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304,308 आणि 337 नुसार पाच आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारनंही मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.


हरणी तलावात बोटिंग करताना अपघात 


वडोदराच्या हरणी तलावात पिकनिकसाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसोबत अपघात झाला. या बोटीवर 27 विद्यार्थी होते आणि इतकंच काय, त्यांना लाईफ जॅकेट न घालता बोटीत बसवण्यात आलं होतं. घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाचं पथक विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी 14 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. 


बोटीत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी : आमदार शैलेश मेहता 


त्याचवेळी याप्रकरणी आमदार शैलेश मेहता म्हणाले की, बोट कंत्राटदाराची चूक आहे, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुलं बसली होती, सोबत शिक्षकही होते. याप्रकरणी शासनाकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याआधी गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या दुःखद घटनेत केवळ 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. बोट बुडाल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सायंकाळी उशिरा या प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला.


एबीपी अस्मिताने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व विद्यार्थी वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असून ते येथे सहलीसाठी आले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.