डेहराडून : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तिरथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज संध्याकाळी चार वाजता ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तिरथ सिंह हे  गढवाल मतदारसंघाचे खासदार आहेत. या आधीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तिरथ सिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 


उत्तराखंडात गेले तीन दिवस चाललेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक आता समाप्त झाला असून  त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी तिरथ सिंह यांच्यासह धन सिंह रावत, सत्यपाल महाराज आणि अजय भट यांच्या नावाची चर्चा होती. त्यामध्ये तिरथ सिंह यांनी बाजी मारली. 


तिरथ सिंह यांचा जन्म 9 एप्रिल 1964 रोजी गढवालमध्ये झाला.  उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आलेले 50 वर्षीय तिरथ सिंह हे 1997 ते 2002 पर्यंत उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर 2000 ते 2002 या दरम्यान त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंडचे शिक्षण मंत्री म्हणून काम केलं. 2012 ते 2017 या काळात त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्व केलं. 2013 ते 2015 या दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे.