Uttarakhand : भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या, पोलीसांची गाडी अडवून संतप्त महिलांची आरोपींना मारहाण
Uttarakhand Murder Case : या प्रकरणी भाजप (BJP) नेत्याच्या मुलासोबत त्याच्या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
Uttarakhand Murder Case : उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील 19 वर्षीय अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजप नेते (BJP Leader) आणि माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य (Pulkit Arya) याला पोलिसांनी अटक केली आहे. पुलकितसोबत त्याचे आणखी दोन साथीदार अंकित उर्फ पुलकित गुप्ता आणि सौरभ भास्कर यांनाही अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून बेपत्ता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 19 वर्षीय अंकिता 18-19 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. 19 सप्टेंबर रोजी सकाळी अंकिता तिच्या खोलीत दिसली नाही. तिचे वडील रिसॉर्टमध्ये पोहोचले आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मुलीचा शोध न लागल्याने हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू होती. यावर डीजीपी अशोक कुमार म्हणाले, पोलिसांकडे याबाबत हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, यानंतर 24 तासात मुख्य आरोपी पुलकित आर्यसह तीन आरोपींना लक्ष्मण झुला पोलिसांनी अटक केली आहे. या तीन आरोपींनी अंकिताला टेकडीवरून खाली नदीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. अंकिता पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर भागातील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट होती. हे रिसॉर्ट पुलकित आर्य यांचे आहे. पोलिसांनी रिसॉर्ट सील केले आहे. येथे महिलांनी पोलिस व्हॅन अडवून आरोपींना मारहाण केली. स्थानिकांनी पुलकित आर्यच्या रिसॉर्टचीही तोडफोड केली.
चौकशीत पोलिसांना सांगितली खोटी कथा
चौकशीदरम्यान पुलकित आर्यने पोलिसांना सांगितले की, रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी काही दिवसांपासून ती मानसिक तणावातून जात होती. यामुळे 18 सप्टेंबर रोजी त्यांना ऋषिकेश येथे फेरफटका मारण्यासाठी आली. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी सकाळी अंकिता तिच्या खोलीतून बेपत्ता होती. पोलिस तपासात ही कथा खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
सीसीटीव्हीमुळे खुनाचे गूढ उघड
पोलिसांनी प्रथम रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. आणि सांगितले की, ऋषिकेशला जाताना अंकिता या लोकांसोबत होती, पण परत आली नाही. त्याचवेळी ऋषिकेशला जाताना पोलिसांनी वाटेत असलेले सीसीटीव्हीही तपासले. तिथून चार लोक निघाले होते असे दिसले, पण खरं तर तिथून तीन लोक येत होते. यानंतर पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींनी पोलिसांना सांगितले की, ते तिघेही अंकितासोबत बॅरेजमध्ये आले होते. इथे सगळ्यांनी मद्यपान केले. यानंतर अंकिता तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पुलकित तिच्यावर दबाव टाकतो, आणि हे ती सर्वांना सांगेन, अशी धमकी देऊ लागली.
पोलिसांची गाडी अडवून महिलांची आरोपींना मारहाण
अंकिताच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी पोलिस व्हॅन अडवून तीन आरोपींना बेदम मारहाण केली. वृत्तानुसार, जेव्हा पोलिस आरोपींना कोर्टात हजर करण्यासाठी कोटद्वारला घेऊन जात होते. दरम्यान, शेकडो ग्रामस्थांनी कोडिया येथे पोलिसांचे वाहन अडवून तिघांनाही मारहाण केली. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्याची जमावापासून सुटका करण्यात आली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध खून आणि पुरावे लपवण्याच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.