उत्तराखंडमध्ये टेम्पो-ट्रॅव्हलर दरीत कोसळली, महाराष्ट्राच्या 4 जणांचा मृत्यू 6 जखमी
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2017 07:35 PM (IST)
फोटो सौजन्य : एएनआय
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यानं झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहेत. यमुनेत्रीहून केदारनाथला जाताना हा अपघात झाला. आज सकाळी अमरावतीतील कुटुंब केदारनाथ यात्रेसाठी यमुनेत्रीहून निघालं होतं. यावेळी एलकेसी मोटर मार्गावरील चंगोर बंद जवळ टेम्पो-ट्रॅव्हलर दरीत कोसळली. या अपघातात अमरावतीचे चंद्रकांत सीताराम कारकर, कुंदादेवी चंद्रकांत कारकर, मीना सुधाकर मुरारी, संजय पाटील या चार यात्रेकरुंचा मृत्यू झाला. तर अपघातात एकूण सहाजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सतीश राऊत, अर्चनादेवी राऊत, आर्या राऊत,पौर्णिमा वैभव, सुधाकर राऊत यांचा समावेश आहे. जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.