Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान समाजवादी पार्टीचे प्रमुख प्रमुख अखिलेश यादव (Akilesh Yadhav) यांचा पुतळा जाळत असताना स्फोटझाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात भाजपच्या नगरच्या आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जयस्वाल (MLA Anupama Jaiswal ) जखमी झाल्या आहेत. अनुपमा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.
अचानक स्फोट झाल्यामुळं खळबळ
दरम्यान. मोर्चात अचानक पुतळा जाळत असताना स्फोट झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. यामध्ये नगरच्या आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जयस्वाल या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे 2 वाजून 20 मिनीटांनी जिल्हाधिकारी (डीएम) चौकात भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आमदार अनुपमा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात होतं. आमदारांनी पुतळ्याला आग लावण्यासाठी जशी माचिस पेटवली, तसा पुतळ्याच्या आत अचानक जोरदार स्फोट झाला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल राय यांनी सांगितलं की, पुतळ्यामध्ये कदाचित पेट्रोलचं प्रमाण जास्त होतं, ज्यामुळे आगीचा गोळा थेट आमदारांच्या चेहऱ्यावर आला. आमदारांचं कपाळ आणि केसाला आग लागली होती, जी कार्यकर्त्यांनी लगेचच विझवली आणि त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राजकीय निदर्शनांमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी आणि पोलीस अधीक्षक विश्वजीत श्रीवास्तव यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन डॉक्टरांकडून आमदारांच्या प्रकृतीची चौकशी केली. संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, पुतळ्यासाठी वापरलेल्या ज्वलनशील पदार्थाच्या अनियंत्रित ज्वलनामुळे हा अपघात घडला. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुतळा जाळताना सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष झाले होते का, हे निश्चित करण्यासाठी संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. या घटनेमुळे राजकीय निदर्शनांमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पुतळा जाळताना ज्वलनशील पदार्थांचा वापर आणि सुरक्षा व्यवस्थेचा अभाव यामुळे अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तपासानंतर आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.
महत्वाच्या बातम्या:
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले