नवी दिल्ली: मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशात पुन्हा 'लॉकडाऊन' लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये तथ्य नसून पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे समोर आले आहे.

Continues below advertisement

नेमका गोंधळ कुठे झाला?

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत जागतिक संकटावर भाष्य करताना 'कोविड-१९' च्या काळातील संकटाचा आणि त्यावेळच्या राष्ट्रीय एकतेचा दाखला दिला होता. या विधानानंतर इंटरनेटवर "भारतात पुन्हा लॉकडाऊन", "Lockdown News" आणि "काय लॉकडाऊन परत येणार?" असे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाऊ लागले.

पंतप्रधानांनी नेमके काय म्हटले होते?

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात युद्धाच्या जागतिक प्रभावावर चर्चा केली. त्यांचे मुख्य मुद्दे होते, "युद्धाची परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहे. देशवासीयांनी प्रत्येक आव्हानासाठी तयार राहिले पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले. या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ टिकू शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. भारताने कोविड काळात ज्याप्रमाणे एकजूट दाखवून मोठ्या संकटाचा सामना केला, तशीच एकजूट आताही गरजेची आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी कुठेही नवीन लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिलेले नाहीत.

Continues below advertisement

"पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण पाहू शकतो की या युद्धाची परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहे. म्हणूनच, मी माझ्या देशवासियांना सांगू इच्छितो की आपण प्रत्येक आव्हानासाठी सज्ज राहायला हवे. या युद्धाचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहण्याची दाट शक्यता आहे, परंतु मी देशातील जनतेला आश्वस्त करतो की सरकार सतर्क आहे, सज्ज आहे आणि अत्यंत गांभीर्याने रणनीतीवर काम करत असून सर्व आवश्यक निर्णय घेत आहे."

सर्वपक्षीय बैठकीमुळे चर्चा वाढली

जागतिक संकट, देशाची अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळी (Supply Chain) यावर चर्चा करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या बातमीमुळे लॉकडाऊनच्या अफवांना अधिक बळ मिळाले. मात्र, ही बैठक केवळ युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची रणनीती ठरवण्यासाठी आहे, लॉकडाऊनसाठी नाही.

सत्य काय आहे?

पंतप्रधानांनी कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. त्यांनी केवळ "सरकार सतर्क आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी रणनीतीवर काम करत आहे," असे सांगून जनतेला आश्वस्त केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.