US Intel Report On India Pakistan and China : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यावर सीमेवरील संघर्ष सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तान वारंवार भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतो मात्र, भारत पाकिस्तानला वेळोवेळी तोंडघशी पाडण्याचं काम चोखपणे बजावत आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत मागे-पुढे पाहणार नाही, असा अहवाल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं दिला आहे. भारताची पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या नव्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय भारत आणि चीनचेही संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढणार : अहवाल
येत्या काळात भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं व्यक्त केली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कुरापतींना भारत पूर्वीपेक्षा अधिक लष्करी ताकदीने प्रत्युत्तर देईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) भारताचे लष्करी सामर्थ्य वाढले आहे. भारत-चीन यांच्यातही सीमावाद सर्वज्ञात आहे. भारत चीनसोबतचा सीमावाद चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण 2020 पासूनचं दोन्ही देशांच्या सैन्यांमधील संघर्ष पाहता संबंध यांच्यातील संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
'पाकिस्तान दहशतवादी संघटनांच्या पाठीशी'
या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव विशेष चिंतेचा विषय आहे. 2021 च्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी पुन्हा नियंत्रण रेषेवर युद्धविराम करण्यास सहमती झाली होती. दोन्ही देश आपले संबंध मजबूत करण्यास उत्सुक आहेत. अहवालात पुढे म्हटलं आहे की, "पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा मोठा इतिहास आहे आणि जर पाकिस्तानने भारताविरोधी कुरापती करण्याचा प्रयत्न केल्यास भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची लष्करी ताकद वाढली असून भारत या शक्तीचा योग्य वापरू शकतो.", असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.
भारत-चीन सीमावाद पेटणार : अहवाल
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, भारत आणि चीन सीमा संघर्षामुळे दोन्ही देशांनी सीमेवर सैन्य तैनात केलं आहे. तसेच दोन्ही देशांकडे अण्वस्त्र शक्तीही मोठी आहे. त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या हितसंबंधांनादेखील थेट धोका निर्माण होतो. याच कारणास्तव भारत-चीन यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं अहवालामध्ये सांगितलं आहे. भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) वारंवार होणाऱ्या छोटे संघर्ष येत्या काळात मोठा संघर्षाचं रूप धारण करु शकतात. हे याआधीच्या घटनांवरूनही सिद्ध झालं आहे.